प्रारंभिक परिचय |
भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करणारे व त्यांच्या संशोधनातून करोडो भारतीयांची भुक भागवणारे भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील कोंबकोणम येथे झाला व त्यांचा मृत्यू २८ सप्टेंबर २०२३ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन आहे.
शिक्षण
डॉ. स्वामीनाथन यांचे प्राथमिक शिक्षण कोंबकोणम येथील स्थानिक शाळेत झाले. विज्ञान विषयात शालेय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी १९४७ मध्ये मद्रास विद्यापीठातील कोयंबतूर कृषी महाविद्यालयातून बीएससी कृषी उत्तीर्ण केले व त्यांचे पदाव्युतर पदवीचे शिक्षण वनस्पती जनुकीय शास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यांनी डॉक्टरेट पदवी केंम्ब्रीज विद्यापीठातून पूर्ण केली व पोस्ट डॉक्टरेट पदवी व्हीस्कॉन्सीन या विद्यापीठातून पूर्ण केली.
हरित क्रांतीची गरज का पडली ?
१). वारंवार पडणारे दुष्काळ :- भारत स्वतंत्र झाल्यानंतर, १९६४-६५ आणि १९६५-६६ मध्ये भारताने दोन गंभीर दुष्काळ अनुभवले ज्यामुळे देशाच्या वाढत्या लोकसंख्येमध्ये अन्नाची कमतरता पडली.
२). आर्थिक अडचणी :- अल्पभूधारक शेतकर्यांना सरकार आणि बँकांकडून किफायतशीर व्याजदराने कर्ज पुरवठा मिळणे खूप कठीण होते आणि म्हणून ते खासगी किंवा सावकारांकडून कर्ज घेत असत. काही शेतकऱ्यांनी जमीनदारांकडून कर्ज घेतले, कर्ज देणाऱ्या जमीनदारांनी जास्त व्याज आकारले आणि कर्जाची वेळत परतफेड न झाल्याने जमीनदारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या व त्या शेतकर्यांचे आर्थिक शोषण केले गेले.
३). कमी उत्पादकता :- भारताची वेगाने वाढणारी लोकसंख्या, शेतीच्या पारंपारिक पद्धती आणि सततचे दुष्काळ, पिकांचे पारंपारिक वाण यामुळे कृषी उत्पादनावर मोठा परिणाम झाला. १९६० च्या दशकापर्यंत, या कमी उत्पादकतेमुळे भारताला अन्नधान्याची टंचाई जाणवू लागली जी इतर विकसनशील देशांच्या तुलनेत अधिक तीव्र होती.
डॉ स्वामिनाथन यांचे संशोधन कार्य
डॉ. स्वामिनाथन यांची १९४९ मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली होती, परंतु नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२ मध्ये पीएच.डी. केली आणि परदेशात विविध संधी असतानाही ते भारतात परतले आणि डॉ. स्वमिनाथन यांनी सेन्ट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कटक (ओरिसा) येथे सहाय्यक वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून आपल्या संशोधनाची सुरवात केली आणि नंतर भारतीय कृषी संशोधन संस्था येथे सहाय्यक जनुकीय शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले आणि डॉ. स्वामिनाथन यांनी सुरवातीच्या संशोधनात क्ष – किरण व गॅमा – किरण यांच्यापासून होणाऱ्या विकीरनांचे पेशींवर आणि पिकांवर होणाऱ्या बदलांचे संशोधन केले. मेक्सिको मध्ये डॉ नॉर्मन बोरलॉग यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या ठेंगण्या व तांबेरा रोगाला कमी बळी पडणाऱ्या आणि उच्च उत्पादनक्षमता असलेल्या वाणांचे क्षेत्रीय चाचणी प्रयोग घेतले, त्यातील काही वाणांचे भारतीय वाणांपेक्षा तिपटीने उत्पादन मिळाले.
१९६५ च्या रब्बी हंगामात राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजने अंतर्गत देशाच्या गहू पिकवणाऱ्या विवध भागात जास्त उत्पन्न देणाऱ्या वाणांची लागवड केली गेली. अवघ्या चार वर्षाच्या कालावधीत भारताच्या वार्षिक गहू उत्पादनात क्रांती झाली. १९६७ मध्ये गव्हाचे उत्पादन दुपटीने वाढल्याने भारत प्रथमच अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. त्यामुळे अमेरिकेतील पी.एल. ४८० अंतर्गत मागवण्यात येणाऱ्या गव्हाची आयात कमी करण्यात आली. गहू उत्पादना बरोबर फिलिपिन्समधील भाताच्या उच्च उत्पादनक्षम वाणांची भारतात व इतर आशियाई देशांत लागवड करून भाताच्या उत्पादन वाढीतही योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुवासिक बासमती तांदळाचे उच्च उत्पादनक्षम व दर्जेदार ‘पुसा बासमती’ हे वाण विकसित करण्यात आले.
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६८ मध्ये पुसा संशोधन केंद्राला भेट देऊन शास्त्रज्ञांचे आणि शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. त्याच कार्यक्रमात इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, “डॉ स्वामिनाथन हे अलौकिक क्षमतेचे शास्त्रज्ञ व मुत्सदी आहेत, ज्यांनी भूक्मुक्तीच फक्त घडवून आणली नाही तर देशाला कृषीशक्तीत रुपांतरीत केले आहे.
डॉ स्वामिनाथन यांना मिळालेले प्रतिष्ठेचे पुरस्कार :-
१). भारत सरकार तर्फे १९६७ साली पद्मश्री, पद्मभूषण (१९७२), व पद्मविभूषण (१९८९).
२). फिलिपिन्स राष्ट्राध्यक्षांचा ‘गोल्डन हार्ट’ पुरस्कार आणि जागतिक अन्न पुरस्कार (१९८७).
३). नेदरलँड्सचा ‘कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क’ पुरस्कार (१९९०)
४). चार्ल्स डार्विन आंतरराष्ट्रीय शास्त्र व पर्यावरण पुरस्कार (१९९३)
५). संयुक्त राष्ट्र संघटनेचा ‘सासाकावा पर्यावरण पुरस्कार’ (१९९४)
६). युनेस्को गांधी सुवर्णपदक (१९९९)
७). शांती, नि:शस्त्रीकरण व विकासासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार (१९९९)
८). ‘फ्रान्कलीन डी रुझवेल्ट स्वातंत्र’ पुरस्कार (२०००)
९). फ्रान्सचा ‘कमांडर ऑफ एग्रीकॉल मेरीट’ पुरस्कार (२००६).
भारताचे खरे रत्न व भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी भारताला आणि भारतातील लोकांना १९७० च्या दशकात दुष्काळामुळे होणाऱ्या लाखो भुकबळीपासून वाचवण्याचे आणि अन्नधान्य उत्पादनात भारताला स्वयंपूर्ण करण्याचे मोलाचे योगदान दिले, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील लोकांच्या भुकमुक्तीसाठी अर्पण केले.
Comments
Post a Comment
या वेबसाइटवरील मत हे वैयक्तिक असून यातून कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला नाही.
या वेबसाइटवरील महितीची सत्यता दुसरीकडून पडताळून पहावी.